छत्रपती संभाजीनगर,
(सांजवार्ता ब्युरो): शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार दि. १४ मे रोजी उस्मानपुरा येथील मोरया चौक परिसरात विशेष मोहीम राबवून १५० मिमी उप जलवाहिनीवरील ४२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दि. १३ मे रोजी
आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कडक आदेश देण्यात आले. तसेच शहरातील
मुख्य व वितरण जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. अधिकृत नळ धारकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा मिळावा, हा या मोहिमेमागील मुख्य
उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता वसंत भोये आणि उपअभियंता किरण धांडे, पथक अभियंता रोहित इंगळे, शाखा अभियंता मिलिंद भामरे, कनिष्ठ अभियंता विक्रांत सावंत, सुमित बोराडे आदींचा सहभाग होता. यापुढेही अनधिकृत नळ जोडण्यांविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













